ब्रिटनमध्ये (Britain) सध्या नव्या कोरोनाचा प्रकार स्ट्रेन हैदोस घालत आहे. यात राज्यातही या स्ट्रेनचे 8 प्रवासी सापडले होते. हे प्रवासी ब्रिटनवरून आले होते. त्यामुळे या नव्या वादळाने महाराष्ट्रात तिच स्थिती निर्माण करु नये म्हणून परदेशातून येणाऱ्या विमान प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली आहे. या संदर्भात ते केंद्र सरकारशी बोलणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, " ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले, की इतर राज्यातल्या विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे". याबाबत केंद्र सरकारने काहीतरी भूमिका घ्यावी असेही ते म्हणाले.हेदेखील वाचा- Mumbai Local For General Public: मुंबई लोकल सेवा सर्व मुंबईकरांसाठी सुरु होण्याची शक्यता, लवकरच होणार निर्णय
दरम्यान ब्रिटनमधून परतलेल्या 8 प्रवाशांमध्ये नव्या कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेने योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाले तर त्यावर उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus ) नियंत्रणात आहे. इंग्लंडमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे (New Coronavirus Strain) राज्यात केवळ 8 रुग्ण आहे. त्याबाबतही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरु आहे. त्यामंळे राज्यातील जनतेने निश्चिंत परंतू सावध राहावे, असे अवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे.