महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांच्या (Top 5 Chief Ministers) यादीमध्ये स्थान मिळाले आहे. मूड ऑफ द नेशन अंतर्गत एका एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात हे परिणाम समोर आले आहेत. देशाचा मूड जाणून घेण्यासाठी वर्षातून दोनदा अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जाते. मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारे हे निकाल निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कामाच्या आधारे ठरलेल्या देशातील पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. सर्वेक्षणाच्या निकालानुसार, कामगिरीच्या आधारे देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत.
त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या क्रमांकावर आहेत. ओडिशात बिजू जनता दल, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूमध्ये द्रमुक, महाराष्ट्रात तीन पक्षांची भाजपविरोधी महाविकास आघाडी आणि केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरल्याचा आरोप भाजप करत आहे. परंतु ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढली आहे आणि त्यांचे काम लोकांना आवडले आहे, ते पाहता भाजपला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. कारण आता महापालिका निवडणुकीत भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेना या सर्वेक्षणाच्या निकालाचा फायदा करून घेत जोरदार प्रचार करणार आहे. दुसरीकडे गेल्या सव्वा दोन वर्षांत मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री टॉप 5 मध्ये कसे आले, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांसाठी गेल्या 80 ते 90 दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. त्यांना मुंबईबाहेर महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो?’ (हेही वाचा: आज बाळासाहेब ठाकरे असते तर महाराष्ट्रात विरोधकांची चिवचिव थांबली असती, संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल)
दरम्यान, सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सातव्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा, आठव्या क्रमांकावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि नवव्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत. गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना 40 टक्के पेक्षा कमी रेटिंग मिळाले आहे.