Lockdown: महाराष्ट्रात 15 मे नंतर लॉकडाऊन वाढवायचा की थांबायचा? राजेश टोपे यांनी केले स्पष्ट
Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रातील (Maharashtra) दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची (Coronavirus) रुग्ण संख्या चिंताजनक आहे. राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनास यश येत आहे. मात्र, इतर काही जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. याचपार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक वाढवणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु, 15 मे नंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार की कोरोना निर्बंधांना शिथिलता देण्यात येणार? यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारांहून अधिक आहे. राज्यातील 36 पैकी केवळ 12 जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट कमी होताना दिसत आहे. परंतु, अनेक जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असून तेथील रुग्ण सख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे अशा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात लॉकडाऊन वाढवायचा की थांबवायचा? याचा विचार 15 तारखेनंतरच करण्यात येणार आहे, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पीएम नरेंद्र मोदी यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बातचीत

महाराष्ट्रात काल (7 मे 2021) 54 हजार 022 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 37 हजार 386 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 42 लाख 65 हजार 326 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6 लाख 54 हजार 788 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.36% झाले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

तसेच, महाराष्ट्रात कालपर्यंत 1 कोटी 77 लाख 17 हजार 242 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 7 मे 2021 रोजी 3 हजार 718 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 3 लाख 63 हजार 765 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असेही राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.