TILA JAGU DYA: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या अवाजातील गाणे सोशल मीडियावर सध्या भलतेच व्हायरल झाले आहे. अनेकांनी या गाण्यावर टीका करत खिल्ली उडवली आहे. मात्र, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना मात्र या गाण्यातील आशय भलताच आवडला आहे. ठाकूर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन त्याबाबत ट्विटरवर तशी पोस्टही लिहीली आहे.
यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल आहे. गाण्याचा आशय छान आहे.मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. माझ्या शुभेच्छा!''. (हेही वाचा, अमृता फडणवीस यांचे तिला जगू द्या हे गाणे ऐकून 'हिला नको गाऊ द्या' असे म्हणत महेश टिळेकरांनी केली कडक शब्दांत टिका, सोशल मिडियावर केली भली मोठी पोस्ट)
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीस यांचा गायिका म्हणून महाराष्ट्राला परिचय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताकाळात त्यांनी बरीच गाणी गायली. त्यांच्या गाण्यामुळे त्या नेहमीच चर्चेत आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांची सत्ता गेल्यानंतरही त्यांनी आपल्या गायनाचे वेड कायम ठेवले आहे.
सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल आहे. गाण्याचा आशय छान आहे.मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. माझ्या शुभेच्छा!!!https://t.co/m9Ygrg1K0z
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 19, 2020
अमृता फडणवीस यांचे 'बेटी बचाव'चा संदेश देणारे 'तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या,' हे गाणे भाऊबीजेच्या मुहूर्तावर अलीकडेच युट्युबवर रिलीज झाले. अमृता फडणवीस यांचे हे गाणे युजर्सना मात्र बऱ्याच प्रमाणात आवडले नाही. त्यामुळे या गाण्याखाली डिसलाईक्स आणि कमेंट्स यांचा पाऊस पाहायला मिळत आहे. अनेकांनी तर या गाण्यावर केवळ टीकाच केली नाही तर या गाण्याची खिल्लीही उडवली आहे.
यशोमती ठाकूर यांच्या कौतुकानंतर अमृता फडणवीस काय प्रतिक्रिया देतात का याबाबत उत्सुकता आहे. अमृता फडणवीस यांनी मात्र अद्यापपर्यंत तरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. युजर्सनी मात्र या गाण्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.