Molestation: विवाहितेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे गुन्हाच, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय
Court Hammer | (Photo Credits-File Photo)

देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि विनयभंगाच्या (Molestation) घटना थांबायचे नाव घेत नाहीत. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. याचपार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) महिलांच्या बाजूने महत्वाचा निर्णय दिला आहे. ‘विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ असे लिहिलेले पत्र किंवा प्रेम व्यक्त करणारी कविता, शायरी लिहिलेला कागद फेकणे’ हा विनयभंगच असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

अकोला जिल्ह्यात 2011 साली आरोपीने एका विवाहित महिलेला प्रेम पत्र दिले होते. परंतु, तिने पत्र घेण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने या महिलेच्या अंगावार पत्र फेकून तिला आय लव्ह यू म्हणाला होता. एवढेच नव्हेतर, आरोपीने या महिलेला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हे देखील वाचा- NCB कडून मुंबई विमानतळावर एका परदेशी नागरिकाला अटक, शरिरात लपवण्यात आलेले जवळजवळ 1 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

नागपूर खंडपीठाने काय म्हटले?

याप्रकरणातील सुनावणी करत असताना नागपूर खंडपीठाने दोन्ही बाजूचे मत जाणून घेतले. त्यानंतर नागपूर खंडपीठाने निर्णायात असे म्हटले आहे की, विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा देखील गुन्हाच आहे. पुरुषी मानसिकतेमधून केलेली छोटीशी कृती देखील विनयभंग असू शकते, असे नागपूर खंडपीठाच्या निर्णायातून सिद्ध होते.

देशात दररोज विविध ठिकाणी महिला वियनभंगाच्या तक्रारी दाखल केल्या जातात. ऑफिस, बस स्थानक, रेल्वेस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी दररोज हजारो महिलांचा विनयभंग केला जातो. मात्र, नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर महिलांना मानसिक बळ मिळण्याची शक्यता आहे.