केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील एसएसपीएम लाइफटाइम मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचे उद्घाटन केले. शाह यांचा सिंधुदुर्गचा हा पहिलाच दौरा आहे. यापूर्वी शनिवारी अमित शहा येथे येणार होते, पण शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलला. एसएसपीएम लाइफटाइम मेडिकल कॉलेज हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आहे. या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासह नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार राजकीय फटकेबाजी केली. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, असे अमित शाह म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले. ‘सत्तेच्या लालसेपोटी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवेसनेने राजकारणासाठी सिद्धांत मोडले. जनादेश नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन करण्याचा होता. मात्र उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिले होते. पण मी कधीही काही बंद खोलीत करत नाही. जे करायचे ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही घाबरत नाही जे होते ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असे कोणतेही वचन दिले नव्हते. बिहारमध्ये आम्ही वचन दिले आणि जास्त जागा असूनही नितीश कुमार यांना सांगितल्यानुसार मुख्यमंत्रिपद दिले.’
ते पुढे म्हणाले, 'महाराष्ट्रात ऑटो रिक्षासारखे तीन चाकी सरकार बनले आहे. ज्याचे तीनही चाके वेगवेगळ्या दिशेने चात आहेत.’ दुसरीकडे शहा यांच्या भेटीपूर्वी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी काय केले? बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेना वेगळी होती. पण आता ते (उद्धव ठाकरे) हिंदुत्वासाठी काय करू शकतील? त्यांना अद्याप कोरोनामधून बाहेर पडता आले नाही. फक्त आपले हात धुवा आणि हे करा, ते करा अशी आवाहने करत आहेत.’ (हेही वाचा: सचिन तेंडुलकर ला कृषी कायद्यासंदर्भातील ट्विट बद्दल सल्ला दिल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नागरिकांनी व्यक्त केला संताप)
ते पुढे म्हणाले, ‘ते म्हणाले, ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी व इतर पक्षांसह राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले त्याच दिवशी शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिली. मुख्यमंत्रीपदासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी हिंदुत्व सोडले.’