Omicron Subvariants Detected In Mumbai: मुंबई आढळले ओमिक्रॉन सब-व्हेरिएंट BA.5 प्रकारातील एक तर BA.4 चे 3 रुग्ण
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Omicron Subvariants Detected In Mumbai: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सोमवारी सांगितले की, मुंबईत कोरोनाचे ओमिक्रॉनचे चार उपप्रकार आढळले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, मुंबईत BA.5 सब-व्हेरियंटचे एक प्रकरण आणि ओमिक्रॉनच्या BA.4 सब-व्हेरियंटचे तीन प्रकरणे आढळून आली आहेत. तथापि, आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, ओमिक्रॉनच्या उप-प्रकाराची लागण झालेले चारही रुग्ण आता बरे झाले आहेत.

BA.4 आणि BA.5 हे कोरोनाच्या अत्यंत सांसर्गिक ओमिक्रॉन स्ट्रेनचे उप-रूप आहेत. ज्यामुळे देशात महामारीची तिसरी लाट आली होती. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सोमवारी सांगितले की, कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेने तीन रुग्णांमध्ये BA.4 उप-प्रकार आणि एकामध्ये BA.5 उप-प्रकारची पुष्टी केली आहे. चार रुग्णांपैकी दोन मुली होत्या, ज्यांचे वय 11 वर्षे होते. इतर दोन रुग्ण 40 ते 60 वयोगटातील होते. (हेही वाचा - COVID-19 Vaccination: Corbevax ला कोरोना बूस्टर डोस म्हणून मंजूर; DCGI ने दिला ग्रीन सिग्नल)

एका दिवसापूर्वीच्या तुलनेत कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. परंतु, दैनंदिन संसर्गाचे प्रमाण तीन टक्क्यांच्या पुढे गेले आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता आरोग्य मंत्रालयाने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, दैनिक संसर्ग दर 3.24 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 2.21 टक्के झाला आहे.

दरम्यान, रविवारी 8,582 च्या तुलनेत सोमवारी 8,084 प्रकरणे नोंदवली गेली. ज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 2,946 आणि केरळमध्ये 1,955 प्रकरणे आहेत. यादरम्यान 10 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून त्यापैकी प्रत्येकी तीन मृत्यू केरळ आणि दिल्लीतील आहेत.

देशातील सक्रिय प्रकरणांमध्ये 3482 ची वाढ झाली असून त्यांची संख्या 47995 झाली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.11 टक्के आहे. रुग्णांचा बरा होण्याचा दर 98.68 टक्के आहे आणि मृत्यू दर 1.21 टक्के आहे. कोविन पोर्टलनुसार, आतापर्यंत एकूण 195.20 कोटी अँटी-कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.