रस्ता नसल्याने मतदानावर बहिष्कार (संग्रहित-संपादित प्रतिमा)

लातूर: सध्या देशात चालू असलेल्या लोकसभा निवडणुकां (Lok Sabha Elections)मुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. सोशल मिडीयावर कोणत्या पक्षाची सत्ता येणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशात लातूर जिल्ह्यातील सुनेगांवाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून गावात पक्का रस्ता नाही, एसटीची सोय नाही, याबाबत लढा देऊनही सरकार काही पावले उचलत नाही म्हणून गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. तहसीलदारांना याबाबत निवेदनही देण्यात आले आहे.

भाजप सरकार सत्तेत आल्यावर देशात अनेक बाबतीत क्रांती झाली. गरिबांसाठी अनेक योजना सुरु झाल्या. आरोग्य, शिक्षण यावर बराच खर्च केला गेला. मात्र सुनेगांव येथे लोकांना आवश्यक असणाऱ्या प्राथमिक गरजाही उपलब्ध नाहीत. गावात रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना 5 कि.मी. च्या अंतरासाठी 15 ते 20 कि मी अंतराचा फेरा मारावा लागतो. रस्ता नसल्याने गावात एसटीदेखील येत नाही. त्यामुळे जोपर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत मतदान करणार नाही असे ग्रामस्थांनी ठरवले आहे.

या गावाला रस्ता देण्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून, विविध प्रकारे आंदोलने करूनही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. या गावात 160 घरे आहेत, गावची एकूण लोकसंख्या 1500 इतकी आहे. जवळजवळ 700 मतदार या गावात आहेत. 2017 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवेळीही असाच बहिष्कार टाकला होता, त्यावेळी या गावासाठी कच्चा रस्ता बांधून देण्यात आला. मात्र पावसाळ्यात हा रस्ता वाहून गेला. आता इतक्या मोठ्या निवडणुकीच्यावेळी तरी गावकऱ्यांच्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा आहे.