गृहमंत्री Anil Deshmukh यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही; दिल्लीत NCP नेत्यांच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण
Jayant Patil | (Photo Credits: ANI)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या पत्रानंतर महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत राजकीय गदारोळ माजला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्यावर भाजप ठाम आहे, दुसरीकडे याच संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक महत्वाची बठक पार पडली आहे. दिल्ली येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. एटीएस आणि एनआयए तपास करीत आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खळबळजनक आरोपानंतर ही बैठक फार महत्वाची मानली जात होती. रविवारी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. कमलनाथ या बैठकीत कॉंग्रेसकडून सहभागी झाले होते. तत्पूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले की, अधिकारी कितीही मोठा असला तरी राज्य सरकार त्याची योग्य ती चौकशी करेल. हा सरकारचा निर्णय आहे. या पत्रावरून तपास विचलित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याक्षणी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही.’ तसेच उद्या आणि परवा मित्रपक्षांशी चर्चा करु असेही ते म्हणाले आहेत.

ही बैठक तब्बल अडीच तास चालली. अशाप्रकारे अनिल देशमुख राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असा दावा केला आहे. (हेही वाचा: Parambir Singh यांच्या आरोपांबाबत केंद्रीय मंत्री Ravi Shankar Prasad यांनी टीका करत उपस्थित केले अनेक प्रश्न; म्हणाले, 'शरद पवार यांची भूमिका संशयास्पद')

यानंतर विरोधी पक्षाने ही बाब उचलून धरली असून अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अनेक भाजप नेत्यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही आज पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे सरकारवर टीका केली आहे.