Parambir Singh यांच्या आरोपांबाबत केंद्रीय मंत्री Ravi Shankar Prasad यांनी टीका करत उपस्थित केले अनेक प्रश्न; म्हणाले, 'शरद पवार यांची भूमिका संशयास्पद'
File Image of Union Minister Ravi Shankar Prasad | (Photo Credits: IANS)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी पाठवलेल्या पत्रामुळे सध्या एकच गदारोळ माजला आहे. या पत्रामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा दावा केला आहे. हे प्रकरण विरोधी पक्षाने चांगलेच उचलून धरले आहे. आता केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. रविवारी, बिहार भाजपा राज्य मुख्यालय, पाटणा येथे पत्रकारांना बोलताना रविशंकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘सचिन वाझे यांना बरीच वर्षे निलंबित करण्यात आले होते, अनेक वर्षांनी कोरोना काळात त्यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपकडून पहिला प्रश्न असा आहे की, सचिन वाझे यांची नियुक्ती कोणाच्या दबावाखाली झाली होती? यासाठी शिवसेनेचा दबाव होता? का मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्रातील जेष्ठ नेते शरद पवार याचा दबाव होता?’ पुढे ते म्हणाले की, सचिन वाझे यांच्या नियुक्तीबाबत बचाव केला गेला मात्र आम्हाला जाणून घ्यायचे आहे की त्यांना पुन्हा सेवेत का घेतले गेले?’

पुढे ते म्हणाले, ‘सचिन वाझे यांच्या चेहऱ्यामागून आणखी कोणती घाणेरडी कामे करण्याचा प्रयत्न केला गेला हे भाजपाला जाणून घ्यायचे आहे. माझ्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत, मी असा मुख्यमंत्री कधीही पहिला नाही जो एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा बचाव करीत आहे. सचिन वाझे यांचा बचाव नक्की का गेला केला? सचिन वाझे यांच्या पोटात अजून कोणत्या गोष्टी आहेत?’

ते म्हणाले. ‘आजूबाजूच्या संशयास्पद परिस्थितीतून, आम्ही कायदेशीररित्या असे अनुमान काढू शकतो की सचिन वाझे यांना अनेक गोष्टी माहित आहेत, ज्यामुळे राजकीय आणि नोकरशाही पातळीवरील संपूर्ण प्रशासन त्याचे संरक्षण करीत आहे.’ त्यांनी अजून एक प्रश्न उपस्थित करत म्हटले की, ‘शरद पवार यांची नक्क्की भूमिका काय आहे? शरद पवार हे वरिष्ठ नेता आहे मात्र त्यांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. परमबीर यांनी पत्रात म्हटले आहे की ते शरद पवार यांना ब्रीफ देत होते, मात्र शरद पवार सरकारमध्ये नाहीत तर त्यांना का व काय ब्रीफ केले जात होते? जर शरद पवारांना अशा गंभीर आरोपांबद्दल माहिती दिली जात होती, तर त्यांनी हे थांबवण्यासाठी काय कारवाई केली?’

ते म्हणाले, ‘जर मुंबईचे टार्गेट 100 कोटी होते तर संपूर्ण महाराष्ट्राचे टार्गेट काय होते? जर एका मंत्र्याचे टार्गेट 100 कोटी होते तर इतर मंत्र्यांचे टार्गेट काय होते? हा भ्रष्टाचार नाही, त्याला ऑपरेशन लूट असे म्हणतात. 100 कोटी खंडणीचा आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी स्वत:साठी दिला होता का संपूर्ण पक्षासाठी? का महाराष्ट्र सरकारसाठी? उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना याचे उत्तर द्यावे लागेल. ही भ्रष्टाचाराची अत्यंत गंभीर बाब आहे.’ (हेही वाचा: अर्धवट सत्य बोलतायत शरद पवार, कोणत्याही किंमतीत सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका)

शेवटी, रविशंकर प्रसाद यांनी, मुख्यमंत्री वाझे यांचा बचाव करतात व गृहमंत्री महिन्याला 100 कोटी गोळा करण्यास सांगतात ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. तसेच बाह्य एजन्सीकडून प्रामाणिक, पारदर्शक आणि निःपक्षपाती याची चौकशी करण्याची मागणी भाजप करत आहे असेही ते म्हणाले.