महाराष्ट्रात हळूहळू कोरोना वायरसचा (Coronavirus) धोका आटोक्यात येत आहे. यामध्ये राज्य सरकार कडून विविध स्तरावर कोविड 19 निर्बंधांमधून सवलती देण्यात आल्या आहेत. मात्र सिनेमागृहं आणि नाट्यगृह (Theaters) दुसर्या लॉकडाऊन नंतर अजूनही बंदच आहेत पण येत्या 5 नोव्हेंबर पासून नाट्यगृहं 50% क्षमतेने सुरू करण्यासाठी सरकारने हिरवा कंदील दिला आहे. आज अखिल भारतीय नाट्य परिषद (Akhil Bhartiya Natya Parishad) सदस्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
नाट्यकर्मी आणि नाट्यरसिकांसाठी राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. 5 नोव्हेंबर अर्थात मराठी रंगभूमी दिनाचं औचित्य साधत कोविड 19 निर्बंधांमधून नाट्यगृहांची मुक्तता होणार आहे. आता नाट्यगृहं पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कामांना सुरूवात केली जाऊ शकते असे सांगण्यात आले आहे. पहिल्या लॉकडाऊन नंतर काही दिवसांनी पुरेशी खबरदारी घेत नाट्यगृहं सुरू झाली होती पण दुसर्या लाटेत सारेच बंद झाले आहे.
राज्यात नाट्यगृहं बंद राहिल्याने अनेक मालकांचं आणि बॅक स्टेज आर्टिस्टचं नुकसान झालं आहे. पण आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे त्यांना देखील दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात सध्या मालिका आणि सिनेमांचं शूटिंग बायोबबल मध्ये करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.