राज्यात तसेच देशात बँक घोटाळ्याचे प्रमाण वाढले आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या दि म्युनिसिपल को. ऑप. बँकेमध्ये (Municipal Co Op Bank Ltd) कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. म्युनिसिपल बँकेच्या मुलुंड शाखेत हा प्रकार समोर आल्यानंतर मुंबईतील इतर शाखांमध्येही गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. तसेच काही जणांकडून हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे वृत्त लोकमतने दिले आहे.
सध्या मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई शहरात एकूण 22 शाखा आहे. तसेच या बँकेमध्ये ग्राहकांची 84 हजार 912 खाती आहेत. मागील वर्षात या बँकेच्या ठेवीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या या बँकेत 3 हजार 481 कोटी ठेवी आहेत. विशेष म्हणजे या बँकेत सर्वसामान्य ग्राहकांची संख्या जास्त आहे. दरम्यान, मुलुंड शाखेतील शिपाई कार्यालयीन वेळेनंतर कॉम्पुटरमध्ये काम करत असल्याचे बँकेच्या कॅशिअर महिलेच्या निदर्शनास आले होते. हा शिपाई शाखा व्यवस्थापकाच्या आयडीचा वापर करत होता. या शिपायाने बँकेतील अनामत रकमेवर (एफडी) येणाऱ्या एकत्रित व्याजाची रक्कम परस्पर बनावट शून्य ठेवीचे खाते तयार करून त्यात एनईएफटीद्वारे वळवली होती. मागील दीड वर्षांपासून हा शिपाई मुलुंड शाखेत काम करत आहे. दरम्यान, हा शिपाई वरिष्ठ बँक अधिकारी किंवा काही संचालकांसोबत हातमिळवणी करून हा प्रकार करत असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या शिपायाने आतापर्यंत 3 कोटी 49 लाख इतक्या पैशांचा गैरव्यवहार केली आहे. (हेही वाचा - PNB Scam: नीरव मोदी याचा जामीन अर्ज ब्रिटन न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळला)
दरम्यान, मुंबई महापालिका बँकेचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांनी सांगितले की, या प्ररकणाचा तपास सुरू आहे. बँकेत झालेल्या गैरव्यवहार रकमेचे लेखापरीक्षण सुरू आहे. याबाबत पोलिसांकडेही तक्रार दिली आहे. खातेदारांनी काळजी करू नये. त्यांचे पैसे सुरक्षित आहे. मुलुंडमध्ये झालेली फसवणुकीची रक्कम ही कार्यालयीन खर्चातील असल्याचंही रावदका यांनी म्हटलंय. परंतु, या प्रकरणी कोणतीही तक्रार पोलिसांकडे आली नसल्याचे मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षत रवी सरदेसाई यांनी सांगितलं आहे.