Maharashtra Legislature Monsoon Session: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरपासून सुरु होणार
महाराष्ट्र विधिमंडळ (संग्रहित संपादित प्रतिमा)

Maharashtra Legislature Monsoon Session: महाराष्ट्र विधिमंडळाचे (Maharashtra Legislature) पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) येत्या सोमवारपासून म्हणजेचं 7 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार आहे.

याअगोदर 3 ऑस्टपासून हे अधिवेशन घेण्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलं होतं. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याने हे अधिवेशन 7 सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा - Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,118 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,11,964 वर)

यासंदर्भात अधिक माहिती देताना संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितलं की, पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरला सुरु होईल. हे अधिवेशन किती दिवसांचं असेल, कशा पद्धतीने होईल हे ठरवण्यासाठी अधिवेशनाआधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल. या बैठकीत अधिवेशन किती दिवसांचं असायला पाहिजे, अधिवेशनात कोणते विषय घेतले पाहिजेत हे सर्व ठरवण्यात येईल.

दरम्यान, राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 15 मार्चच्या सुमारास कोरोनामुळे स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अधिवेशन बोलवावे लागेल होते.