Nitesh Rane (Photo Credit - Twitter)

भाजपचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत बोलताना, दिशा सालियनच्या (Disha Salian) हत्येचे पुरावे लवकरच आपण न्यायालयामार्फत सीबीआयकडे सोपवणार असल्याचे जाहीर केले. सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूला 2 वर्षे पूर्ण होत आहेत, पण आतापर्यंत या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. दिशाच्या मृत्यूचे गूढ आतापर्यंत उककले नाही. दिशाने मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाचे म्हणजे दिशाच्या मृत्यूच्या 6 दिवसांनंतर सुशांत सिंग राजपूत देखील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता, त्यानंतर लोकांनी दोन्ही मृत्यूंमध्ये संबंध जोडण्यास सुरुवात झाली. याआधी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनची तीन-चार जणांनी बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. दिशा सालियन ज्या ठिकाणी मरण पावली, त्या ठिकाणी एका मंत्र्यांचे वाहनही होते, असेही ते म्हणाले होते. सुशांत सिंग राजपूतला हे सर्व माहीत होते, त्यामुळेच त्याचीही हत्या झाली. म्हणजेच सुशांत सिंगनेही आत्महत्या केलेली नाही, असे राणेंचे म्हणणे होते.

आता आज विधानसभेमध्ये बोलताना नितेश राणे म्हणाले की, ‘दिशाची खरच आत्महत्या असेल तर तिच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज का गायब केले गेले? इमारतीच्या वॉचमनला का काढून टाकले? इमारतीमधील एन्ट्रीबाबतच्या रजिस्टरमधील दोन पाने का गायब केली गेली? बलात्कार आणि हत्येमध्ये राज्यातील एका मंत्र्याचा सहभाग असल्याची माहिती आहे. दिशाची हत्या झाली असल्याचे दर्शवणारे पुरावे आहेत. याबाबतचा पेन ड्राईव्ह आपण न्यायालयामार्फत सीबीआयला देऊ. आम्ही तिला न्याय मिळवून देऊ.’ (हेही वाचा: CM Uddhav Thackeray on ED: ईडी आहे की घरगडी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत फटकेबाजी)

दरम्यान, दिशा सालियनच्या पालकांनी शुक्रवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पत्र लिहून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा आमदार मुलगा नितेश राणे यांच्यावर आपल्या दिवंगत मुलीची बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रात नमूद केले आहे की, ‘आमच्या मुलीच्या मृत्यूमुळे आमचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यात राणे आणि इतर लोक याबाबत खोटी माहिती पसरवत आहेत. गुन्हा दाखल होऊनही केंद्रीय मंत्री राणे आणि त्यांच्या मुलाने आमचे नाव बदनाम करणे थांबवले नाही. असे दिसते की आम्ही जिवंत असेपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही.’

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर सालियनच्या मृत्यूची खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी 27 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिवंगत दिशा सालियनच्या विरोधात पिता-पुत्राने बदनामीकारक टिप्पणी केली होती.