
मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित असली ऐतिहासिक तलवार, महाराष्ट्रात परत आणली जात असून, ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये मांडलेल्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. मंत्री शेलार यांनी सांगितले, इतिहासातील अत्यंत मोलाच्या वस्तूची पुनर्प्राप्ती करून मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण जागवली जात आहे. लंडनमध्ये लिलावात नागपूरच्या भोसले राज घराण्याशी संबंधित ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परत आणण्याचा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
ही तलवार छत्रपती शाहू महाराजांच्या काळात रघुजी भोसले (प्रथम) यांनी बंगाल व ओडिशापर्यंत लढलेल्या लष्करी मोहिमांमध्ये वापरलेली होती. शेलार यांनी सांगितले, लंडनमधील एका कंपनीच्या लिलावात ही तलवार विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रयत्नातून आणि विशेष पुढाकारातून जवळपास 69 लाख 94 हजार 437 रुपयांना ही तलवार विकत घेण्यात आली. या तलवारीची मुठ सोन्याची आहे. या तलवारीवर रघुजी भोसले यांचे नाव कोरलेले आहे. (हेही वाचा: Shiv Sena UBT-MNS Mumbai Rally: मराठी अस्मितेसाठी तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र; वरळीच्या NSCI डोम येथे हिंदी सक्तीविरोधात संयुक्त रॅली)
या ऐतिहासिक तलवारीचे कस्टम क्लिअरन्स व पॅकिंगचे काम पूर्ण होऊन 15 ऑगस्टपूर्वी ही तलवार महाराष्ट्रात आणली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. रघुजी भोसले पहिले हे नागपूर भोसले राजघराण्याचे संस्थापक होते आणि 1695 ते 1755 दरम्यान त्यांनी मराठा सैन्यात सेनापती म्हणून काम केले. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या धाडस आणि लष्करी नेतृत्वाची दखल घेत त्यांना, 'सेनासाहेब सुभा' ही प्रतिष्ठित पदवी देऊन गौरवले. त्यांचे कोरलेले नाव आणि सोन्याचा मुकुट असलेली ही तलवार त्यांनी मराठा शौर्याच्या लढायांमध्ये वापरली. वसाहत काळात ईस्ट इंडिया कंपनीमार्फत ती भारतातून बाहेर पडल्याचे मानले जाते.