President's Rule (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रामधील सत्तानाट्याने काल संध्याकाळी अचानक वेग घेतला आहे. भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) सत्तास्थापन करण्यात असमर्थ ठरल्याने आता राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रवादीला आज रात्री साडेआठ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र अजूनही कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये एकी होऊ शकली नाही. अशात राज्यपालांकडून केंद्रीय मंत्रिमंडळाकडे तसेच राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन होत नसल्याचा अहवाल केंद्राकडे पाठवला आहे.

महाराष्ट्रात ठरल्या वेळेत सत्ता स्थापना होत नसल्याने राज्यपाल यांनी राष्ट्रपतीकडे अहवाल सादर केला आहे. कलम 356 (Article 356) नुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस राज्यपालांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय बेठीक बोलवली होती. ही बैठक संपल्यानंतर आता राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादीला आज रात्री साडेआठ पर्यंत सत्ता स्थापन करण्याची मुदत आहे. त्यामुळे येत्या 4 तासांत महाशिवआघाडी एकत्र आली नाही, तर आज रात्री उशिरा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. (हेही वाचा: शरद पवार यांना सत्तास्थापनेसंबंधी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार; राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत ठराव मंजूर)

दरम्यान, राज्यपालांनी सत्तास्थापन करण्यासाठी भाजपला 2 दिवसांची मुदत दिली होती. मात्र शिवसेनाला अवघे 24 तास दिले गेले होते. इतक्या कमी वेळेत शिवसेना सत्ता स्थापन करू शकली नाही. याच बाबतीत शिवसेनेने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली गेली आहे. दुसरीकडे आज संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी-कॉंग्रेस नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नक्की काय निर्णय होईल याची उत्सुकता लागली आहे.