Gateway Of India Mumbai | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Gate Way of India Shut for Tourists: रत्नागिरी जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर (Harihareshwar Beach) काही दिवसांपूर्वी संशयास्पद बोट सापडली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईची वैभवशाली असलेली वास्तु आणि मुंबईची ओळख असलेलं गेट वे ऑफ इंडिया (Gate way of India) काही दिवस पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. आगामी काळात राज्यात अनेक सण-उत्सव आहेत. याशिवाय पुढील आठवड्यात गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) सुरु होत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

'गेट वे ऑफ इंडिया' नेमके किती दिवस बंद राहणार याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. पुढील काही दिवस 'गेट वे ऑफ इंडिया'वर सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. पुढील सुचना येईपर्यंत गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. (हेही वाचा - Maharashtra Monsoon Assembly Session: सत्ताधारी आमदारांची विरोधकांविरोधात विधानसभेबाहेर निदर्शने)

दरम्यान, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात 18 ऑगस्ट रोजी एक संशयास्पद बोट सापडली होती. या बोटीत एके-47 रायफल्स, आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे सापडले होते. ही संशयास्पद बोट सापडल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. हरिहरेश्वर समुद्रकिनारा मुंबईपासून 200 किमी आणि पुण्यापासून 170 किमी अंतरावर आहे. पोलिसांनी ही संशयास्पद बोट ताब्यात घेतली आहे.

आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हरीहरेश्वर येथील किनारपट्टीवर आढळलेल्या संशयीत बोटीचा छडा लावण्यात पोलिस यंत्रणांना यश आलं होतं. ही बोट ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीच्या मालकीची असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं.