
देशात होणारी घोटाळ्यांची प्रकरणे काही थांबायचे नाव घेत नाहीत. देश पातळीवर अनेक राजकारणी यात अडकले आहेत, मात्र आता महाराष्ट्रातील एक नाव यात गोवले जात आहे ते म्हणजे पंकजा मुंडे (Pankaja Munde). महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकज मुंडे यांनी मोबाईल खरेदीमध्ये तब्बल 106 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला आहे. हा घोटाळा पंकजा मुंडे यांच्या विभागातच झाला असल्याने आता यावर राजकीय वर्तुळात चर्चा घडत असल्याचे दिसत आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाकडून, 30 जिल्ह्यातील 85 हजार 452 अंगणवाडी केंद्रामध्ये संगणक माहिती सक्षम रीयल-टाईम मॉनिटरींग करण्यासाठी मोबाईल खरेदीला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार बंगळुरूमधील एम एस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि.या कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा I7 (Panasonic Eluga I7) हा मोबाईल खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये 6 हजार 499 रूपये इतके बाजारमूल्य असलेल्या मोबाईलसाठी पंकजा मुंडे यांच्या विभागाकडून प्रती मोबाईल 8 हजार 777 रुपये देण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. अशाप्रकारे जास्त पैसे दिल्याचे दाखवून पंकजा मुंडे यांनी 106 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा: खुशखबर! ग्रामविकास विभागात 21 पदांसाठी, 13 हजार 514 जागांची मेगाभरती; पंकजा मुंडे यांची घोषणा)
दरम्यान, हे मोबाईलचे मॉडेल 2018 साली बाजारात आले होते. त्यानंतर या मोबाईलचे उत्पादन थांबवण्यात आले होते. आता हा मोबाईल बाजारात उपलब्ध नसताना बेकायदेशीररित्या हा मोबाईल विकत घेतला जात आहे, त्यामुळे या सर्व प्रकारांची कसून चौकशी केली जावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.