केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर केला आहे. त्यानंतर संपूर्ण देशभरात या अर्थसंकल्प संदर्भात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केंद्र सरकारच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. तर, याच अर्थसंकल्पावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच थोडासा अवधी घेऊन या अर्थसंकल्पावर व्यवस्थित बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ”बजेट हा देशासाठी पाहिजे, निवडणुकांसाठी नको. तसेच हा देशाचा अर्थसंकल्प आहे, निवडणुकांचा नाही. थोडासा अवधी घेऊन मी अर्थसंकल्पावर व्यवस्थित बोलणार आहे.” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात पश्चिम बंगाल, केरळ व दक्षिणेकडील राज्यांसाठी मोठ्याप्रमाणावर तरतूद केल्या गेल्याचे दिसत आहे. हे देखील वाचा- Union Budget 2021: हे आत्मनिर्भर नाही तर, देशाला बरबादीकडे नेणारं अस्ताव्यस्त बजेट- उपमुख्यमंत्री अजित पवार
याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर बाण सोडला आहे. 'कोरोना व त्याआधीही ही रोजगार संपला असताना रोजगार निर्मितीचे काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच विधानसभा निवडणूक असलेल्या राज्यांसाठी हा अर्थसंकल्प असून महाराष्ट्र यात दिसत नाही. कंपन्या व्यतिरिक्त आता जमिनी विकण्याकडेही केंद्र सरकारचा कल आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे.