मुंबईतील (Mumbai) शिवडी (Sewri) परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. जामिनासाठी पैसे नसल्याने एका आरोपीने शिवडी न्यायालयाच्या (Sewri Court) इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या प्रकारात आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेंद्र वाल्मिकी, असे या आरोपीचे नाव आहे. राजेंद्र वाल्मिकी आणि त्याच्या सहा साथीदारांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत एका टेम्पो चालकाकडून पैसे उकळले होते. त्यानंतर पोलिसांनी वाल्मिकी आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती.
या प्रकरणी न्यायालयाने या सर्वांना जामिनासाठी प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड देण्यास सांगितले होते. मात्र, जामिनासाठी पैसे नसल्याने अटक टाळण्यासाठी राजेंद्रने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. (हेही वाचा -Thane: शेजारी राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी दोन भावांना अटक; भिवंडी येथील घटना)
जामिनासाठी पैसे नसल्याने पैसे भरण्यासाठीची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती करण्यासाठी वाल्मिकी आणि त्याचे इतर साथीदार शुक्रवारी न्यायालयात हजर झाले होते. मात्र, न्यायालयाने पैसे भरण्यास मुदतवाढ न दिल्यास अटक होणार, या भीतीने वाल्मिकीने न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेतमुळे शिवडी न्यायालयात गोंधळ उडाला. या घटनेत वाल्मिकी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे. दरम्यान, मुंबईतील एका इमारतीच्या 23व्या मजल्यावर स्टंट करणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मुंबई पोलिसांना या व्हिडिओचा तपास करत या तरूणाला अटक केली होती.