21 वेळा बाळंत महिला/लंकाबाई खरात (संग्रहित संपादित प्रतिमा)

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील बीड (Beed) येथे एका महिलेचे चक्क 21 वे बाळंतपण चालू असल्याचे समोर आले होते. बीडच्या माजलगावपासून दोन किलोमीटर अंतरावरील केसापुरी वसाहतीत ही महिला रहात होती. अखेर या महिलेने आपल्या 21 व्या बाळाला जन्म दिला आहे. मात्र प्रवासामुळे या अर्भकाचा मृत्यू झाला असून, माता सुखरूप आहे. विशेष म्हणजे बाळंतपणाच्या तिसऱ्या दिवशी या आईने आपल्या कामालाही सुरुवात केली आहे. लंकाबाई खरात असे या महिलेचे नाव असून, मालोजी देविदास खरात असे त्यांच्या पतीने नाव आहे.

लंकाबाई या 40 वर्षांच्या आहेत. त्यांना आधीच नऊ मुली आणि दोन मुले अशी 11 अपत्ये आहेत. त्यांची नऊ अपत्ये बाळंतपणानंतर दगावली. आता त्या 21 व्या वेळी बाळंत होत्या मात्र हे अर्भकही दगावले आहे. लंकाबाई यांची सर्व बाळंतपणे घरीच झाली आहेत, त्या जेव्हा 21 व्या वेळी बाळंत आहेत हे समजल्यावर आरोग्य विभागाने, त्यांना सरकारी रुग्णालयात भरती केले. या दरम्यान त्यांची तपासणी केली असता सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचे दिसून आले आहे. मात्र कर्नाटकात ऊसतोडीची कामे सुरु झाली आणि लंकाबाई आपल्या कुटुंबासह अशा अवघडल्या अवस्थेत प्रवासाला निघाल्या.

(हेही वाचा: धक्कादायक! बीड जिल्ह्यातील महिलेचे 21 वे बाळंतपण; 38 व्या वर्षी 11 मुले व 18 नातवंडे, प्रशासनही चक्रावले)

प्रवासात ट्रॅक्टरमध्येच त्या प्रसूत झाल्या, मात्र त्यानंतर दोन दिवसांनी ट्रॅक्टरमधील धक्क्यामुळे अर्भकाचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेलाच बाळाचे अंत्यसंस्कार करून त्या तिसऱ्या दिवशी कामाला लागल्या. याधी तपासणीदरम्यान गर्भपिशवी नाजूक झाल्याचे रुग्णालयाने सांगितले होते, तसेच ही प्रसूती दवाखान्यात व्हावी यासाठी आग्रही धरला होता. मात्र हातावरचे पोट असल्याने लंकाबाई यांनी त्यास नकार देत ऊसतोडीच्या कामासाठी निघून गेल्या.