महाराष्ट्रातील ठाणे (Thane) शहरात एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. या शिक्षिकेने शाळेची फी (Unpaid Fees) न भरल्याबद्दल काही विद्यार्थ्यांना शिक्षा केली होती. त्यामुळे तिला निलंबित करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ठाण्यातील एका खाजगी शाळेत विद्यार्थ्यांनी शाळेची फी आणली नाही म्हणून, शिक्षिकेने सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या वहीत 'उद्या मी माझ्या शाळेची फी आणायला विसरणार नाही' असे 30 वेळा लिहायला सांगण्याची शिक्षा केली होती.
शिक्षिकेने विद्यार्थ्यांना केलेल्या या शिक्षेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यानंतर काही पालकांनी विरोध सुरू केला. ठाणे महानगरपालिकेने याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेला भेट देऊन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याबाबत शनिवारी जारी केलेल्या पत्रकात टीएमसीने म्हटले आहे की, शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनंतर शाळा व्यवस्थापनाने या शिक्षिकेने निलंबित केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, शिक्षण विभागाने शाळेला शिक्षिकेवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, असा इशाराही शाळेला देण्यात आला होता. शाळा या प्रकरणाची चौकशी करत असून शिक्षण विभाग याकडे लक्ष ठेवून आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर फी भरण्यासाठी दबाव आणणे चुकीचे असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले. (हेही वाचा: Career Camps: खुशखबर! राज्यातील 36 जिल्ह्यांत 6 मे ते 6 जून 2023 दरम्यान करिअर शिबिरांचे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार विविध अभ्यासक्रमांची व नवीन संधींची माहिती)
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना मानसिक किंवा शारीरिक छळाला सामोरे जावे लागेल, असे वातावरण निर्माण करण्यावर बंदी आहे. प्रसिद्धीनुसार, या प्रकारच्या परिस्थितीचा मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो आणि शाळेने त्याबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे.