ठाणे: हजार रुपयांच्या खरेदीवर 1 किलो कांदे फ्री, दुकानदाराकडून ग्राहकांना भन्नाट भेट
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

सध्या राज्यात कांद्याचे दर वाढल्याने सामान्यांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. मात्र याच परिस्थितीत ग्राहकांना आपल्या दुकानात आकर्षित करण्यासाठी ठाणे येथील एका दुकानदाराने भन्नाट आयडिया आणली आहे. त्यानुसार त्यांच्या दुकानात 1 हजार रुपयापर्यंत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1 किलो कांदे फ्री देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. शीतल हॅन्डलूम असे दुकानाचे नाव असून ते ठाण्यात स्थित आहे.पीटीआयला दिलेल्या वृत्तानुसार, शनिवार नंतर दुकान मालकाने साडी सोबत कांदे फ्री मिळणार असल्याचे जाहीर केले. सध्या राज्यात कांदा 130 रुपये किलोने विक्री केला जात आहे. त्यामुळेच खरेदी केल्यावर कांदा विकणे ही भन्नाट आयडिया दुकानदाराने शोधून काढली आहे. खरेदीवरील या भन्नाट भेटीमुळे ग्राहकांची फार मोठी रांग असल्याचे दुकानदाराने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी तमिळनाडू येथील एसटीआर मोबाईल दुकानदाराने सुद्धा अशीच ऑफर जाहीर केली होती. त्यामध्ये स्मार्टफोन खरेदीवर कांदे फ्री मिळणार असल्याचे सांगितले होते. कांद्याचे दर 81 टक्क्यांनी गेल्या महिन्यात वाढले आहेत. मात्र डिसेंबर महिन्यात याचे दर 101.35 रुपये प्रति किलो झाले आहेत. मात्र गेल्या वर्षात याच महिन्यात कांद्याचे दर 55.59 रुपये आणि 19.69 रुपये किलो होते.(पुढील आठवड्यात कांद्याचे दर कमी होणार, सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता)

कांद्यांच्या दराने शंभरी पार केली असून लोकांच्या डोळ्यातून किंमती ऐकून अश्रू यायची वेळ आली आहे. मात्र सरकारकडून कांद्याचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.. तर सोलापूर येथील बाजारात कांद्याचे दर 200 रुपयांच्यावर गेले आहेत. यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून कांदा खरेदी करायचा की नाही असा पेच निर्माण झाला आहे. त्याचसोबत तमिळनाडू येथील मदुराई मध्ये कांद्ये 200 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.