Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

गेल्या काही वर्षांपासून अनेक तरुणांमध्ये इन्स्टाग्राम रीलची (Instagram Reels) क्रेझ वाढलेली दिसून येत आहे. रील्स बनवणाऱ्या क्रिएटर्सची संख्याही लक्षणीय वाढली आहे. आजकाल तर लोक रील बनवण्यासाठी कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत. यामध्ये अनेक अपघातही झाले असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. आता डोंबिवलीजवळील ठाकुर्ली येथेही अशीच घटना घडली. या ठिकाणी शनिवारी रील बनवताना पंपहाऊसमधील खोल विहिरीत पडून एका 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला

विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. बिलाल सोहेल शेख असे मृताचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.एम.भालेराव यांनी सांगितले की, ‘मृत बिलाल हा शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंपहाऊसवर त्याच्या दोन मित्रांसह इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी गेला होता. रील बनवत असताना बिलाल विहिरीत पडला. यावेळी त्याने आरडाओरडा केला, मदतीची याचना केली मात्र त्याला वेळेवर मदत मिळू शकली नाही. त्याच्या दोन्ही मित्रांना पोहायला येत नव्हते.’

त्यानंतर मित्रांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बिलालचा शोध सुरु केला. तब्बल 32 तासांच्या प्रयत्नानंतर सोमवारी अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. (हेही वाचा: बेंगळुरू येथे गीझरमधील विषारी गॅस गळतीमुळे लिव्ह-इन जोडप्याचा मृत्यू; बाथरूममध्ये आढळले मृतदेह)

दरम्यान, याआधी गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन परिसरात रेल्वे ट्रॅकवर रील बनवत असताना एक महिला आणि दोन पुरुषांचा रेल्वेने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला होता. रेल्वे स्टेशन मास्टरकडून पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती. नुकतेच बिलासपूर-काटघोरा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता बांधणीच्या कामातील मिक्सर मशीन वाहनाच्या धडकेत चार अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी हे चार तरुण सोशल मीडियासाठी रील बनवत होते.