Baby (File Image)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील कळवा (Kalwa) येथील शासकीय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात (NICU) गेल्या महिन्यात तब्बल 21 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. याच रुग्णालयात डिसेंबर 2023 मध्ये 24 तासांच्या कालावधीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये हॉस्पिटलला भेट दिली होती आणि परिस्थिती सुधारण्याचे आदेश दिले होते. मात्र तेव्हापासून या रुग्णालयामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही. गुरुवारी एफपीजेशी संपर्क साधला असता, रुग्णालयाचे डीन डॉ. राकेश बारोट यांनी 21 मृत्यूंची पुष्टी केली.

यातील बहुतेक नवजात बालकांना खाजगी रुग्णालयांमध्ये वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, गंभीर अवस्थेत या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. ही बाब लक्षात घेऊन ही मृत्यूंची संख्या जास्त चिंताजनक नसल्याचे त्यांनी सांगितले. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. जयेश पानोत म्हणाले, ‘संबंधित बहुतेक मुलांना जन्मानंतर लगेचच उपचार मिळाले नाहीत. त्यानंतर मुलांना या रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत, मौल्यवान वेळ आधीच वाया गेला होता. यामुळे त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या फारसे काही केले जाऊ शकले नाही.’ (हेही वाचा: Girl Attacked With Scissors: एकतर्फी प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा! मुलीच्या मानेवर कात्रीने केले 6 वार, वर्धा जिल्ह्यातील घटना)

डॉ पनोत पुढे म्हणाले की, ‘एनआयसीयूमध्ये 35 खाटा आहेत, ज्या पालघर आणि इतर आदिवासी भागातील रुग्णांचा भार हाताळण्यासाठी पुरेसे नाहीत. एनआयसीयू असलेले पुढील हॉस्पिटल नाशिक येथे आहे. आणखी एका डॉक्टरने सांगितले की, काही खासगी रुग्णालये बाळांना दोन दिवस दाखल करून, भरमसाठ फी आकारून आणि नंतर सोडून देऊन, मुलांच्या पालकांची पिळवणूक करतात.

दरम्यान, नवजात बालकांच्या मृत्यूचा मुद्दा शुक्रवारी (5 जुलै) महाराष्ट्र विधानसभेत उपस्थित करण्यात आला आणि आता राज्याचे एक मंत्री रुग्णालयाला भेट देणार आहेत. शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यमंत्री उदय सामंत यांनी आता हॉस्पिटलला भेट देऊन सभागृहात निवेदनाद्वारे अहवाल सादर करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.