Food Poisoning | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Students Suffer From Food Poisoning: महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातील एका खाजगी आश्रमशाळेतील (Ashram School) 100 हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची लक्षणे दिसून आली आहेत. त्यानंतर मुलांना बुधवारी ठाणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी घटनेच्या एका दिवसानंतर, गुरुवारी पोलिसांनी चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला. ठाणे पोलिसांनी ही माहिती दिली. शाहपूर तहसीलदार कोमल ठाकूर यांनी पीटीआयला सांगितले की, बुधवारी अन्नातून विषबाधा झाल्याने 48 मुलींसह एकूण 117 विद्यार्थ्यांना शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा (आदिवासी मुलांची निवासी शाळा) या ठिकाणी ही घटना घडली. ही शाळा मुंबईच्या बाहेरील शहापूर तालुक्यातील भातसई येथे आहे. शाळेत इयत्ता 1 ते 10 पर्यंत 290 विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी 168 बुधवारी उपस्थित होते.

या मुलांना बाहेरून आणलेले जेवण देण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांना जेवणात पुलाव आणि गुलाब जामुन दिले गेले होते. मात्र या पदार्थांचे सेवन केल्यानंतर मुलांना उलट्या आणि अन्न विषबाधाची इतर लक्षणे जाणवली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत जिल्हा ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, घडल्या प्रकरणाबाबत शाळा अधीक्षक, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि बाहेरून अन्न आणणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Mumbai News: इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट, घाटकोपर येथे खळबळ)

त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 284 (विषारी द्रव्ये निष्काळजीपणे हाताळणे, मानवी जीवन धोक्यात आणणे), 336 (मानवी जीवन किंवा इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारी कोणतीही कृती करणे), 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या 117 विद्यार्थ्यांपैकी सात मुलींवर अजूनही उपचार सुरू आहेत, तर इतरांना घरी सोडण्यात आले आहे. मुलांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.