Thane Rain Update (Photo Credits: ANI)

मुंबईसह ठाणे (Thane), पालघर (Palghar) जिह्यात मागील 2-3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच असून सततच्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. ठाण्यात (Thane) सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले तर अनेक परिसरात वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण झाली. तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. पावसाचा हा जोर आजही कायम राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून सर्व तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी नागरिकांना केले आहे.

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील प्रसिद्ध उपवन तलाव पुरेपूर भरले असून पाणी रस्त्यावर आलेले पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ठाण्यातील वंदना सिनेमागृहाबाहेर देखील पाणी साचलेले चित्र पाहायला मिळाले.

High Tide in Mumbai Today: मुंबईत आज दुपारी 1 वाजून 51 मिनिटांनी समुद्रात उसळणार 4.33 मीटरच्या लाटा, पावसाचा जोरही राहणार कायम

ठाण्यात 149mm पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा हा जोर आजही कायम राहणार असून ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्याचे ठाणे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे. त्याचबरोबर खबरदारी म्हणून नागरिकांनीही विनाकरण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

मुंबई सह उपनगरात तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, कोकण, तळकोकण भागात कालच्या दिवसभरात पाऊस चांगलाच जोर धरून कोसळत होता. पुढील 48 तास सुद्धा हीच परिस्थिती कायम राहील असे अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहेत. मुंबईतील अरबी समुद्राच्या वर ढगाळ वातावरण असल्याने काही भागात आज कालच्या पेक्षाही मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे.