Thane Building Collapse: ठाणे शहरातील डायघर परिसरात 5 मजली इमारतीचा भाग कोसळला; सुदैवाने जिवितहानी नाही
Collapse. (Photo Credits: ANI File | Representational Image)

ठाणे (Thane) मधील डायघर (Daighar) परिसरात 5 मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. ही घटना शुक्रवार 12 ऑगस्ट च्या रात्री 11 वाजून 50 मिनिटांची आहे. ठाणे RDMC प्रमुख अविनाश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'इमारतीमध्ये एकूण 30 भाडेकरू होते. 8 घरांतील भाडेकरू वगळता इतरांनी आपली घरं रिकामी केली होती. इमारतीचा भाग कोसळल्याची घटना समोर येताच फायर ब्रिगेड आणि RDMC ची टीम तेथे पोहचली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. इमारतीचा भाग कोसळल्याचं समजताच जे भाडेकरू राहत होते त्यांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आलं'.

इमारतीच्या तळमजल्यावर 15 शॉप्स आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ही सारी शॉप्स रिकामी करून पोलिसांनी सील केलेली आहेत. या इमारतीचा विद्युतपुरवठा देखील या घटनेनंतर बंद करण्यात आला आहे. या इमारतीमध्ये आणि आजूबाजूच्या चाळीत राहणार्‍यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कारणास्तव या इमारतीला पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या इमारतीच्या आजुबाजूचा सारा भाग कॉर्डन ऑफ करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे सोबतच वारा देखील सोसाट्याचा असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाच्या दिवसांत धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना हमखास दिसून येतात.