ठाण्यातील (Thane) कल्याण (Kalyan) जवळ 2013 साली ट्रेनमध्ये महिलेची छेड काढलेल्या 56 वर्षीय आरोपीला दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे. अशा प्रकराच्या घटनांकडे गंभीरपणे न पाहिल्यास यामुळे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या अनेक महिलांची सुरक्षितता आणि जीवन धोक्यात येईल. कल्याण येथील रेल्वे न्यायालयाच्या न्यायिक दंडाधिकारी (प्रथम श्रेणी) स्वतः एस. चोप्रा यांनी दोषीला पीडितेला 10,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसान भरपाई न दिल्यास एक महिना साधारण कारावास भोगावा लागेल.
सहाय्यक सरकारी वकील जयश्री कोरडे यांनी न्यायालयाला सांगितले की, 3 सप्टेंबर 2013 रोजी पीडित महिला नाशिकमध्ये भुसावळ-मुंबई पॅसेंजर ट्रेनच्या जनरल डब्यात चढली आणि एकट्याने प्रवास करताना काही वेळानंतर एका सीटवर झोपली. नंतर जेव्हा गाडी खडीवली स्थानकावर थांबली तेव्हा महिलेला वाटले की कोणीतरी तिला स्पर्श करत आहे आणि जेव्हा ती उठली तेव्हा आरोपी तिच्या शेजारी उभे राहून तिच्याकडे टक लावून पाहत होता. जेव्हा महिलेने आरडाओरड केली, तेव्हा आरोपीने ट्रेनमधून उडी मारली. परंतु, काही लोकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. (Beed Suicide: छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या, उच्चशिक्षित अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल)
आपल्या आदेशात दंडाधिकाऱ्यांनी आरोपीचे कृत्य "रानटी" असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, आरोपीने असभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि तो कोणत्याही सहानुभूतीस पात्र नाही. "जर अशा घटनांना गांभीर्याने हाताळले नाही, तर सार्वजनिक गाड्यांमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षा आणि जीव धोक्यात येईल," असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीवरुन सर्व आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.