Representational Image (Photo Credits: Pixabay)

छेडछाडीला कंटाळून एका 14 वर्षीय मुलीने (Minor Girl) आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोदा (Patoda) परिसरात गुरूवारी (5 ऑगस्ट) घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, मृत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गावातील उच्चशिक्षित अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस पुढील चौकशी करीत आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी पाटोदा तालुक्यातील चुंभळी येथील रहिवासी आहेत. दरम्यान, गुरुवारी मृत मुलीचे आई वडील नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत गावातील उच्चशिक्षित अभियंता असणारा उमेश क्षीरसागर नावाच्या आरोपीने संबंधित 14 वर्षीय पीडित मुलगी आणि तिच्या लहान बहिणीची छेड काढली. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडत मुलीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Pune: मेडिकलमधून कंडोम आणून देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मित्रावर चाकूने वार

या घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पीडित मृत मुलीचे अंबाजोगाई येथील स्वाराती महाविद्यालयातील रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी गावातील आरोपी तरुण उमेश क्षीरसागर याला अटक केली आहे. पोलिसांनी उमेश विरोधात छेडछाड आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.