ठाणे येथे नाल्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू, स्थानिकांकडून संताप व्यक्त
Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

मुंबईतील नाले किंवा खोदकामाच्या ठिकाणी नागरिकांना त्याबाबत सुचना देणारे बोर्ड लावणे अनिवार्य आहे. परंतु असे असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना घडल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहे. त्यातच आता एक नवी भर पडली असून रविवारी दुपारी ठाणे मधील एका 7 वर्षीय चिमुरडा नाल्यात पडला पण त्याला वाचवण्यात आले. पण उपचारासाठी तातडीने त्याला रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. यामुळे मुलाच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून ते या गोष्टीमुळे फार हळहळ व्यक्त करत आहेत.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, ज्या ठिकाणा मुलाचा नाल्यात पडून मृत्यू झाला तो नाला असाच खुला ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले असून त्यांचा भोंगळ कारभार पहायला मिळत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. या नाल्याची कोणत्याही प्रकाराची तपासणी अथवा त्याच्या आजूबाजूला सुचना फलक सुद्धा लावण्यात आलेले नव्हते. दुर्घटनास्थळी ही चौथी घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.(नालासोपारा येथे गटाराच्या पाण्यात वाहून गेल्याने 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू)

तसेच यापूर्वी सुद्धा नाल्यात पडून एका चिमुरड्याने जीव गमावल्याची घटना समोर आली होती. पावसाच्या काळात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. परंतु खेळण्यासाठी आलेल्या एक चिमुरडा नाल्यात कोसळून हरवल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या प्रकरणी कानाडोळा करत स्थानिक नागरिकांनाच सुनावले होते. यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला होता.