Representational Image | (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai) सह अनेक भागात काल पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळाले, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने दरवेळी प्रमाणे याहीवेळेस मुंबईची तुंबई झाली होती. नद्या नाले गटारे सर्व काही अगदी तुडुंब भरून वाहत होते. अशातच नालासोपारा (Nalasopara)  येथील संतोष भुवन (Santosh Bhuvan) एका गटारात 6 वर्षीय चिमुकला पडला. पाण्याचा जोर इतका जास्त होता कि गटाराच्या पाण्यासह हा चिमुकला वाहत गेला. अबू बकर (Abu Bakar)  नामक या मुलाच्या आईवडिलांनी या घटनेनंतर लगेचच तुळींज पोलीस स्थानकात धाव घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहिती दिली. यानंतर वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने अबूचे शोधकार्य सुरू केले. 24 तासाच्या शोध कार्यांनंतर आज या चिमुकल्याचा मृतदेह ओस्तवाल नगर येथे सापडला आहे.

याबाबत तुळींज पोलीसांच्या माहितीनुसार, संतोष भुवन शेजारील गटाराचे झाकण उघडे होते, शेजारी रस्त्यावर पाणी साचलेले असल्याने हे उघडे गटार चटकन लक्षात आले नाही. यावेळी अबूचा पाय त्या गटारात पडला आणि पाण्याच्या ओढ्यासोबत तो खेचला गेला. साहजिकच 24 तासानंतर मुलाचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहून बकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी महापालिकेला जबाबदार ठरवत बकर कुटुंबांनी आपला रोष व्यक्त केला आहे. (नाल्यात कचरा टाकल्यास वस्तीचे पाणी बंद करा, प्रवीण परदेशी यांचा कर्मचाऱ्यांना आदेश)

काल मुंबईत पावसाचा प्रचंड जोर होता, त्यामुळे ज्या तुळींज पोलीस स्थानकात बकर कुटुंबीयांनी धाव घेतली ते पोलीस स्थानकही पाण्यात बुडले होते. दरम्यान, अशा प्रकारे गटारात किंवा मॅनहोल मध्ये पडून यापूर्वीही अनेकांवर मृत्यू ओढवला आहे, याबाबत प्रशासन आता तरी काही कारवाई करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.