Thane Kalwa Suicide Case| Photo Credits: Twitter @NishikantkTOI

ठाणे कळवा उड्डाणपूलावर आज (3 डिसेंबर) आज एका व्य्क्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने काही काळ स्थानिक बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र पोलिस कॉन्स्टेबलने प्रसंगावधान दाखवत त्याला सुखरूप वाचवले आहे. भगवान कांबळे (Bhagwan Kamble) यांनी पूलावरून दोराला लटकत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पुलजवळ बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच कॉन्स्टेबल जयवंत पवार यांनी भगवान यांचा जीव वाचवला. त्यानंतर त्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

भगवान कांबळे यांनी कौटुंबिक त्रासातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. भगवान यांनी कळवा पुलावरून दोर बांधून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी हायड्राच्या मदतीने त्यांना वाचवले. यावेळेस बघ्यांची तोबा गर्दी झाली होती. अशामधील एकाने घटनेचा व्हिडिओ मोबाईलवर रेकोर्ड केला.

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ 

भगवान कांबळे यांना वाचवल्यानंतर नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भगवान यांनी हे कृत्य करताना मद्यप्राशन केल्याचे पोलीस चौकशीत समोर आलं आहे.तर पोलिस कॉन्स्टेबल जयवंत पवार यांच्या शौर्याची दखल घेत त्यांना ठाणे पोलिस आयुक्तांनी 5 हजार रूपयांचे बक्षीस देखील जाहीर केले आहे.