ठाणे: प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने 21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
Representational Image (Photo Credits: Pixabay)

प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने एका 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातून (Thane) समोर आला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी येथील दांडेकरवाडी येथे गुरुवारी (20 फेब्रुवारी) ही घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूरज शिर्के (Suraj Shirke) असं प्रियकराचं नाव असून तो तिच्याच वयाचा होता. याप्रकरणी नौपाडा पोलिस स्थानकात (Naupada Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीसोबत मैत्री झाल्यानंतर सूरजने तिला प्रपोज केलं. सूरजला होकार दिल्यानंतर तिने त्याच्या नावाचा टॅटूही काढला होता. तसंच सूरजशी लग्न करणार असल्याचं तिने कुटुंबियांनाही सांगितलं होतं. मात्र तरुणीने लग्नाचा आग्रह धरल्याने सूरजने तिच्यासोबतचे नाते संपवले. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणीने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. (अकोला: सूवर्णपदक विजेता बॉक्सरपटू प्रणव राऊत याची गळफास घेऊन आत्महत्या)

तरुणी खाजगी क्लासमध्ये नोकरी करत होती. प्रियकराने दिलेला नकार पचवू न शकल्याने तिने राहत्या घरी ओढणीने गळफास लावत आत्महत्या केली. बराच वेळ मुलगी बाहेर न आल्याने कुटुंबियांना संशय आला. रुममध्ये पाहिले असता तेथे तरुणीचा मृतदेह आढळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (धक्कादायक! हिंगोलीत गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार; अत्याचाराला कंटाळून घेतला गळफास)

प्रेमभंगातून आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार घडत असतात. तरी तरुणांनी अशा प्रसंगात खचून न जाता, मनोधैर्य कायम राखणे महत्त्वाचे आहे.