शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam Scam In Maharashtra) घोटाळ्यामध्ये आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलांचं देखील नाव आली असल्याने आता पुन्हा चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान शिवसेनेतून शिंदे गटामध्ये सामील झालेल्या अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणी आरोप फेटाळले असून चौकशीची मागणी केली आहे. एक व्हिडिओ क्लिप शेअर करत त्यांनी हा विरोधकांकडून बदनामी करण्यासाठी रचलेला डाव असल्याचं म्हटलं आहे. टीईटी घोटाळ्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या लेकी हीना सत्तार, उजमा सत्तार, हुमा फरहीन सत्तार, व मुलगा आमेर सत्तार अशी सत्तार यांच्या मुलांची नावं आहेत.
पुण्यामध्ये आरोग्य सेवक भरती प्रकरणाची पुणे पोलिस चौकशी करत असताना टीईटी परीक्षा देखील चूकीच्या पद्धतीने झाल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आले. नंतर काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. ईडी देखील या प्रकरणाची समांतर चौकशी करत आहे. नक्की वाचा: Maha TET Exam Scam: तुकाराम सुपे च्या घरी दुसर्या पोलिस धाडेमध्ये 2 कोटी रूपये, सोनं जप्त .
परीक्षा परिषदेकडून ज्या परीक्षार्थींची नावं परीक्षेत गैरप्रकार केलेल्यांच्या यादीत असतील त्यांच्यावर टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. त्याच यादीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलींच्या नावाचा देखील समावेश आहे. या यादीमध्ये एकूण 7874 जणांचा समावेश आहे. 2019मध्ये झालेल्या या परीक्षमध्ये बोगस पद्धतीने विद्यार्थ्यांना पात्र करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी देत त्यांनी संबंधितांची यादी प्रसिद्ध केली आहे. ही प्रत्येक जिल्हाधिकार्याला देऊन संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
अब्दुल सत्तार माजी मंत्री आणि आमदार आहेत. सिल्लोड मध्ये त्यांच्या शिक्षण संस्था देखील आहेत.