पुण्यात (Pune) कोयता गँगची दहशत काही केल्या कमी होत नाही आहे. पुण्यातील मुंढव्यात देखील कोयता गँगमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. मुंढव्यात कोयता गँगने एका व्यवसायिकाची हत्या केल्याची घटना जाती असतानाच आता एका पानपट्टी चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना ही घडली आहे. पानपट्टी चालकाने उधारीवर सिगारेट न दिल्याने त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पानपट्टीचालक सीताराम साठे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. साठे याची मुंढवा भागातील केशवनगर परिसरात पानपट्टी आहे. आरोपी साठे यांच्या पानपट्टीवर सिगारेट घेण्यासाठी अल्पवयीन मुले नेहमीच येत असे. साठे यांच्याकडून ही मुले उधारीवर सिगारेटची मागणी ही करत असे. उधारीवर सिगारेट न दिल्याने अल्पवयीन मुलांनी साठे यांना धमकी आणि शिवीगाळ केली. यानंतर अल्पवयीन मुलाच्या साथीदारांनी साठे याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
दरम्यान या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनेमुळे पुणे शहर आणि परिसरात दहशतीचे वातावरण पहायला मिळाले आहे. अल्पवयीन मुलांचा देखील गु्न्हेगारीमध्ये वाढता सहभाग पहायला मिळत आहे.