Samruddhi Mahamarg Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा भीषण अपघात, तीन दगावले,समृध्दी महामार्गावरील घटना
Accident, Death प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Samruddhi Mahamarg Accident: उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक शहराकडून गावाकडे जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात अपघाताची मालिका सुरुच असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. रविवारी पहाटे समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका कारला धडक दिल्याने हा अपघात घडून आला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३०४ येथे घडला आहे. (हेही वाचा- किराडपूरा भागात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या पहाटे हा अपघात घडून आला. कारमधून पाच प्रवाशी प्रवास करत होते. कारमधील प्रवाशी छत्तीसगड येथील रहिवासी होते. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मुकेश अनुज राम मेहेर, लताबाई पुरुषोत्तम मेहेर, अत्मजा मुनोरबोद अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारला पाठीमागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला. कारची आणि अज्ञात वाहनांच्या धडकेत हा अपघात घडून आला. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. महामार्गावर होणाऱ्या अपघाताची संख्या पाहून नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.