K. Chandrashekar Rao | (Photo Credits: Facebook)

विठूरायाच्या दर्शनाला अनेक वारकरी पायी वारी करत पंढरपूर मध्ये येतात. पण यंदा आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) मुहूर्त साधत राजकीय रंग देखील पहायला मिळत आहे. 'अब की बार, किसान सरकार' चा नारा देत महाराष्ट्रात पाऊल ठेवू पाहणार्‍या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) देखील आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी अर्थात 27 जूनला पंढरपूरात दाखल होणार आहेत. शासकीय महापूजेचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यानुसार आषाढीला एकनाथ शिंदे विठूरायाच्या चरणी लीन होणार आहेत. त्याआधी एक दिवस के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) विठ्ठल- रूक्मिणीचं दर्शन घेणार आहेत.

आषाढीचा मुहूर्त साधत मागील अनेक वर्ष मध्यप्रदेश चे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह देखील पंढरपूरात येतात. सिंह यांची महाराष्ट्र वारी ही केवळ त्यांच्या श्रद्धेतून असते. पण बीआरएस पक्षा सोबत आता अनेक महाराष्ट्रातील नेते मंडळी कामाला लागले आहेत. देशात शेतकऱ्यांचे राज्य येऊ दे हे साकडे ते शेतकरी , कष्टकऱ्यांच्या विठूरायाला करणार असल्याचे बीआरएस पक्षाचे राज्याचे समन्वयक शंकर आण्णा धोंडगे यांनी सांगितले आहे.

आषाढी एकादशीच्या आधीपासूनच पंढरपूरात जाणार्‍या पुण्यातील सर्व पालखी मार्गांवर आणि पंढरपूर शहरात बीआरएसकडून होर्डिंगबाजी करण्यात आली आहे. पण आता पक्षाचे अध्यक्षच पंढरपूरला येणार असल्याने या आषाढी यात्रेत राजकीय वातावरण देखील तापणार असल्याची चिन्हं दिसायला लागली आहेत.

काही दिवसापूर्वी पंढरपूरचे भगीरथ भालके यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन बीआरएस पक्षात प्रवेश संदर्भात चर्चा केली आहे. त्यांच्यासाठी राव यांच्याकडून खास विमान पाठवण्यात आले होते. आता महाराष्ट्रात राव येणार असल्याने भगिरथ भालके आणि त्यांची टीम देखील कामाला लागली आहे.