Tejaswini Pandit यांचे 'X' (ट्विटर) अकाऊंट टार्गेट, राजकीय दबावामुळे 'ब्लू टीक' गायब झाल्याचा आरोप
Tejaswini Pandit | (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit) हिच्या 'X' (ट्विटर) हँडलला अधिकृततेची असलेली 'ब्लू टीक' हटविण्यात आली आहे. आमच्या टोलचे पैसे गेले कोठे? असा सवाल तिने उपस्थित केला होता. त्यानंतर तिच्या हँडलवरची (Tejaswini Pandit Twitter Account) टीक काढण्यात आल्याचा तिचा दावा आहे. राजकीय दबावातूनच ही कृती करण्यात आल्याचा आरोपीही तिने केला आहे. आपल्या 'एक्स' हँडलवर एक पोस्ट शेअर करत तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तेजस्वीनी पंडित हिने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही! माझ्या एक्स (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक 'आम्हा जनतेची' इतकी वर्षे फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? X (ट्विटर) अकाऊंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातीलआक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा 'जय हिंद जय महाराष्ट्र' साठीचा घोष योग्य वेळी सुरुच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदुमणारच आहे. जय हिंद जय महाराष्ट्र!

तेजस्वीनी पंडित यांनी आपल्या एक्स हँडलवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक टोल मुद्द्यावर प्रतिक्रिया द्ल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हटले होते की, म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister” Unbelievable!!

ट्विट

ठाणे येथील मनसे नेते अविनाश जाधव यांनी टोलच्या मुद्द्यावरुन उपोषण सुरु केले होते. राज ठाकरे यांच्या आदेशावरुन हे उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व ठिकाणी चारचाकी वाहने, रिक्षा आणि दुचाकींना टोल माफ असल्याचे म्हटले होते. त्यावरुन तेजस्वीनी पंडित यांनी एक्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.