महाराष्ट्राच्या विदर्भात असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला (Tadoba-Andhari Tiger Reserve) 1 ऑक्टोबर पासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र या ताडोबा मध्ये क्विन वाघीण 'माया' (Maya Tigress) सध्या गायब आहे. पर्यटकांसोबतच तडोबाच्या व्यवस्थापनालाही'माया' दिसली नसल्याने सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. मायाचं दर्शन 23 ऑगस्ट नंतर झालेले नाही. आता तिचा शोध घेण्यासाठी सुमारे 125 कॅमेरे लावण्यात आले आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये माया वाघिणीची खास शान आहे. 2010 मध्ये तिचा जन्म झाला आहे. त्यानंतर तिनेही काही बघड्यांना जन्म दिला आहे. अनेकदा माया तिच्या बछड्यांसोबत जंगलात फेरफटका मारताना दिसते. तिची झलक पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. पण आता ही 'माया' मागील 45 पेक्षा जास्त दिवसांहून कुणाला दिसलेली नाही. यंदा 1 ऑक्टोबर पासूनच ताडोबाचा गाभा परिसर पर्यटनाला सुरू झाला आहे.
वाघिणीच्या हल्ल्यात वन कर्मचारी स्वाती दुमणे चा मृत्यु झाला होता. तेव्हाही माया ही वाघीण चर्चेत आली होती. माया सध्या 13 वर्षांची आहे आणि या वयात वाघाचा नैसर्गिक मृत्यू होणे स्वाभाविक असल्याने वनविभाग यादृष्टीने पण शक्यता तपासत आहे.
माया या वाघिणीची टी-12 नावाने वनविभागाच्या दफ्तरीत नोंद आहे. तिचं आकर्षण देशा-परदेशातील पर्यटकांना असतं. पण विशिष्ट वाघ दाखवणं हे वनविभागाच्या हातात नाही. त्यामुळे तो नेमका योग जुळून यावा लागतो. पांढरपौनी भागात आपल्या बछड्यासह फिरणार्या मायाची झलक टिपण्यासाठी अनेकदा फोटोग्राफर्सची देखील गर्दी असते. यंदा पाऊसही चांगला झाला असल्याने व्याघ्र प्रकल्पामध्ये घनदाट हिरवळ पसरली आहे.