Pune Metro (PC - Wikimedia Commons)

राज्यात मुंबईनंतर आता पुण्यातही मेट्रोचे (Pune Metro) जाळे उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुणे शहरासाठी वाहतूक कोंडी हे मोठे आव्हान आहे व त्यावर मेट्रो हा एक सोयीस्कर उपाय ठरत आहे. आता पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील बहुप्रतिक्षित स्वारगेट मेट्रो स्टेशनचे (Swargate Metro Station) उद्घाटन गणेशोत्सवादरम्यान होण्याची शक्यता आहे. स्वारगेट स्थानक सुरू झाल्यानंतर पुणे मेट्रो प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. सध्या, वनाझ ते रामवाडी मार्ग पूर्णपणे कार्यरत आहे, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते स्वारगेट मार्ग अर्धवट कार्यान्वित आहे. या मार्गावरील दिवाणी न्यायालय ते स्वारगेट हा भूमिगत मार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

शुक्रवारी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना महा मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन आणि जनसंपर्क) हेमंत सोनवणे म्हणाले की, स्वारगेट मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्याकडून पुढील आठवड्यात तपासणी होणार आहे. त्यानंतर ते क्लिअरन्स सर्टिफिकेट जारी करतील, आणि जर काही बदल सुचवले गेले तर आम्ही ते करू आणि नंतर प्रक्रियेनुसार महाराष्ट्र सरकारला स्टेशन उघडण्यासाठी मंजुरीची विनंती करू.

सोनवणे यांनी सांगितले की, ते हे स्टेशन उघडण्याच्या तारखेची पुष्टी करू शकत नाहीत, परंतु ते सप्टेंबरमध्ये नक्कीच होईल, अशी अशा आहे. दिवाणी न्यायालय ते स्वारगेट हा मार्ग सुरू करण्याची मूळ मुदत 31 मार्च होती. मात्र, आदर्श आचारसंहितेमुळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. (हेही वाचा: Mumbai Metro 3 Project: मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा सप्टेंबरपासून सुरू होणार; डिसेंबर 2024 च्या आधी पूर्ण होणार संपूर्ण प्रकल्प)

पुणे मेट्रोने स्वारगेटकडे जाणाऱ्या बुधवार पेठ आणि मंडई स्थानकांमधून या मार्गावर फेब्रुवारीमध्ये चाचणी चालवली आहे. दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान मेट्रो सेवांची वारंवारता आणि वेळ वाढविण्याच्या योजनेबाबत विचारले असता सोनवणे यांनी अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या शेवटच्या सात दिवसांत भक्तांना गणपती मंडळांच्या दर्शनासाठी मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत चालली होती. या वाढलेल्या वेळेचा पुणे मेट्रोला महसुलाच्या बाबतीतही फायदा झाला.