Pune (Photo credits: Wikipedia)

Swachh Bharat Mission: केंद्र सरकारच्या 2019-2020 या चालू वित्तीय वर्षातील स्वच्छता सर्वेक्षणातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसर्‍या तिमाहीच्या निकालामध्ये इंदौरने यंदाही अव्वल स्थान मिळवले आहे. दरम्यान यापूर्वी सलग 3 वेळेस इंदौरने कमावलेलं हे स्थान कायम ठेवलं आहे. तर यंदाच्या स्वच्छ शहरांच्या निकालामध्ये 'पुणे', 'पिंपरी चिंचवड' नेही बाजी मारली आहे. स्वच्छ शहरांच्या क्रमवारीमध्ये पुणे 12 व्या स्थानावर तर पिंपरी-चिंचवड 14 व्या स्थानावर आहे. स्वच्छता सर्वेक्षण 2020 एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर अशा तीन तिमाहींमध्ये केले जाते. पहिल्या दोन तिमाहीनंतर आता येत्या 4 ते 31 जानेवारीदरम्यान वर्षभराच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये दोन्ही महापालिकांनी उत्तम कामगिरी केल्यास त्यांना पहिल्या 10 मध्ये जागा मिळू शकते.

स्वच्छता सर्वेक्षण 2018 मध्ये इंदौर पहिल्या स्थानावर होते, त्यानंतर भोपाळ दुसऱ्या स्थानावर , तर चंडीगड तिसऱ्या क्रमांकावर होते. तसेच स्वच्छ राज्य म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर झारखंडने बाजी मारली होती. महाराष्ट्र दुसऱ्या, तर छत्तीसगड तिसऱ्या क्रमांकावर होते.

केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी 31डिसेंबरला संध्याकाळी दिल्लीत निर्माणभवन येथे स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन तिमाहींचे निकाल जाहीर केले.सुमारे 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये 2019-20 या वर्षात एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या पहिल्या दोन तिमाहींमध्ये झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात इंदूरने बाजी मारली आहे. तर दुसर्‍या स्थानी राजकोट आहे.