सोलापूर मतदारसंघात लोकसभेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि भाजपतर्फे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. यात प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे हे मुख्य दावेदार मानले जात आहेत. आज एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन नेत्यांची अचानक भेट सोलापूरमधील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये झाली. आंबेडकर आणि शिंदे यांच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून, दोघांनी एकमेकांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनत आहे. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
काय झालं असावं या भेटीत, चर्चेत ? pic.twitter.com/FHh1uLnGAi
— Saamana (@Saamanaonline) April 13, 2019
प्रकाश आंबेडकर हे नगरसेवक आनंद चंदनशिवे व बाळासाहेब वाघमारे यांच्या समवेत आज (शनिवार) सकाळी हॉटेल सरोवर येथे नाश्ता करत होते. त्याच वेळी सुशीलकुमार शिंदे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यास आले, त्यावेळी या दोघांची भेट झाली. दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरकरांनी सुशीलकुमार शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लगेचच ही भेट झाली, त्यामुळे सर्वत्र या भेटीबद्दल राजकीय चर्चा रंगत आहे. (हेही वाचा: सोलापूर: प्रकाश आंबेडकर यांच्या सभेत ‘छोटा पाकिस्तान’ असा उल्लेख; कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल)
मात्र या भेटीमुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे, ‘बाळासाहेब नाश्ता करताना स्वतः शिंदे त्यांना भेटायला आले होते. अचानक झालेली ही भेट आहे. भीमसैनिकांनी याचा वेगळा विचार करू नये, जय भीम...’ असे स्पष्टीकरण अॅड. आंबेडकर यांच्या समर्थकांनी व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर लोकसभेसाठी येत्या 18 एप्रिलला मतदान होत आहे. त्यात तर 16 तारखेला राज ठाकरेंची सभा सोलापूरमध्ये होणार आहे, त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.