Sushant Singh Rajput Death Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांनी या आरोपांचे खंडण 'गलिच्छ राजकारण' अशा शब्दात केले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांचे सूत्रधार आम्हाला माहिती आहेत. विनाकारण आरोप करणाऱ्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.

संजय राऊत हे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. त्यामुळे अनेकांना पोटदुखी सुरु झाल आहे. त्यातून अनेक जण अस्वस्थ आहेत. वैफल्यात गेले आहेत. या वैफल्यातूनच हे गलिच्छ आरोप केले जात आहेत. या आरोपात तथ्य नाही. मात्र, आरोप करणाऱ्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असे सांगायलाही राऊत विसरले नाहीत.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजप खासदार नारायण राणे यांनी काल (4 ऑगस्ट 2020) एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राणे यांनी शिवसेना, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. गुन्हेगारांना पाठिशी घालणे आणि भ्रष्टाचार करणे हेच या सरकारचे काम आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राज्य सरकार एका मत्र्याला वाचवत आहे, असाही आरोप नारायण राणे यांनी केला. राणे यांनी नामोल्लेख टाळला तरी त्यांचा रोख आदित्य ठाकरे यांच्याकडे होता. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Case: हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय- आदित्य ठाकरे)

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही काल (4 ऑगस्ट 2020) सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांचे खंडण केले. सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या धक्कादायक तितकीच दुर्दैवी आहे. या प्रकरणात माझ्यावर होणारे आरोप हे गलीच्छ राजकारण आहे. तरीही, मी संयम बाळगून आहे. मी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणून सांगतो, माझ्या हातून महाराष्ट्र आणि ठाकरे परिवार यांच्या प्रतिमेला धक्का लागेल असे कोणतेही वर्तन होऊ देणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.