File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी बिनय तिवारी (Binay Tiwari) यांच्या नेतृत्वात बिहार पोलिसांचा (Bihar Police) एक पथक मुंबईत (Mumbai) दाखल झाला आहे. दरम्यान, बिहारमधून मुंबईतील गोरेगांवमध्ये आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) होम क्वारंटाईन (Home Quarantine) केले, या आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. यासंर्भात मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली आहे. बिहारमधून आलेले पोलीस अधिकारी देशांतर्गत प्रवासी आहेत. यामुळे त्यांना कोविड19 संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार होम क्वारंटाइन करणे आवश्यक आहे. तसेच होम क्वारंटाइनमधून सूट मिळवण्यासाठी त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणे आवश्यक आहे, असे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तिंसाठी नयमावली ठरवून दिली आहे. ज्यात होम क्वारंटाइनचा समावेश करण्यात आला आहे. यातच बिहार राज्यातून आलेले पोलीस अधिकारी मुंबईतील गोरेगांव (पूर्व) मधील राज्य राखीव पोलीस बल ग्रुप 8 विश्रामगृहात मुक्कामी आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळाली. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने बिहार येथून आलेल्या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तिंसाठी लागू असलेली होम क्वारंटाइनबाबतची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. हे देखील वाचा- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे राजकारण करून महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच षडयंत्र रचले जातेय- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई महानगरपालिकेचे ट्विट-

“बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी बिनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. पण रात्री 11 वाजता मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाइन केले आहे. विनंती करुनही त्यांना आयपीएस मेसमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली नाही. ते गोरेगावच्या एका गेस्टहाऊसमध्ये राहत आहेत” असे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी टि्वट केले आहे.