Covid-19 Relief | (Photo Credit: Archived, edited, representative images)

मुंबई, पुणे, नागपूर सह राज्यात वाढता कोरोना पाहता आता राज्य सरकार अलर्ट मोड वर आले आहे. मागील काही दिवसांत झपाट्याने वाढलेली कोरोना रूग्णसंख्या आरोग्य व्यवस्थेसमोर नवे आव्हान म्हणून उभं ठाकलं आहे. अशामध्ये आता कोरोना संसर्गाला ब्रेक (COVID 19 Infection) लावण्यासाठी राज्य सरकारकडून (Maharashtra Government)  नव्या नियमावलीची घोषणा झाली आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आता विवाह सोहळ्याला (Weddings) केवळ 50 आणि अंत्यसंस्काराला केवळ 20 जण उपस्थित राहू शकणार आहेत.

नवी नियमावली आज (31 डिसेंबर) मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. सध्या एकूणच फेस्टिव्ह सीझन सुरू असल्याने आणि लग्नसोहळ्यांचा काळ असल्याने कोविड 19 नियम धाब्यावर बसवत लोकांचा सर्रास वावर सुरू आहे. आता त्याला नियंत्रणात आणण्याचं काम सुरू झालं आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स सोबत चर्चा केली आहे. त्यानंतर आता नव्या निर्बंधांची घोषणा झाली आहे.

महाराष्ट्रात काल 24 तासांत 5368 नवे रूग्ण समोर आले आहेत. तर मुंबई मध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 3600 च्या पार गेला आहे. राज्यातील ही धडकी भरवणारी कोरोना रूग्णसंख्या पाहता आता नागरिकांनी विना कारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन केले आहे.

मुंबईत कलम 144 लागू करत सार्वजनिक ठिकाणी नववर्षाचा जल्लोष करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.