Supriya Sule Slams Air India | Edited Image

Supriya Sule Slams Air India: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शनिवारी एअर इंडिया (Air India) वर सतत गैरव्यवस्थापन केल्याचा आरोप केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आरोप केला की, प्रवासी प्रीमियम भाडे देत आहेत परंतु त्यांना वेळेवर सेवा मिळत नाही. याप्रकरणी त्यांनी नागरी उड्डाण मंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात नाराजी व्यक्त करताना लिहिले आहे की, एअर इंडियाच्या विमानांना सतत विलंब होत असतो - हे अस्वीकार्य आहे! आम्ही प्रीमियम भाडे देतो, तरीही विमाने कधीच वेळेवर येत नाहीत. व्यावसायिक, मुले आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच या सततच्या गैरव्यवस्थापनाचा सामना करावा लागतो. सतत होणाऱ्या विलंबासाठी विमान कंपनीला जबाबदार धरावे, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडे केली आहे. (हेही वाचा -Supriya Sule On Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये द्या; सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी)

सुप्रिया सुळे यांची एअर इंडियावर टीका -

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, त्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक एआय 0508 ने प्रवास करत होत्या, ज्याला एक तास 19 मिनिटे उशीर झाला. या सततच्या पद्धतीचा प्रवाशांवर परिणाम होत आहे. वारंवार होणाऱ्या विलंबासाठी एअर इंडियासारख्या विमान कंपन्यांना जबाबदार धरण्यासाठी आणि प्रवाशांसाठी चांगल्या सेवा दर्जाची खात्री करण्यासाठी कठोर नियम लागू करावेत, अशी मागणी देखील सुळे यांनी केली आहे. (हेही वाचा -Supriya Sule on Bitcoin Scam: बिटकॉईन खरेदी विक्री प्रकरण; सुप्रिया सुळे यांचे विरोधकांना आव्हान; शरद पवार यांच्याकडून पाठराखण; Ajit Pawar म्हणाले आवाज परिचयाचा)

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना सांगितले की, फ्लाइट ट्रॅकर्समध्ये दोष होते, ज्यामुळे दिशाभूल करणारी माहिती पसरली. मी विमानात दिल्ली विमानतळावर अडकले होते, पण ट्रॅकरने विमानाने उड्डाण घेतल्याचे दाखवले. मी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांसमोर 'ट्रॅकर'चा मुद्दा उपस्थित करेल, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

फ्लाइट ट्रॅकर म्हणजे काय?

फ्लाइट ट्रॅकिंग हे एक तांत्रिक साधन आहे जे रिअल टाइममध्ये विमान उड्डाणांचा मागोवा घेते. हे ट्रॅकर विमानाचे स्थान, उंची, वेग आणि गंतव्यस्थान याबद्दल माहिती प्रदान करते. याचा वापर प्रवासी, विमान कंपन्या आणि विमान वाहतूक अधिकारी करतात. प्रवासी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्यासाठी ट्रॅकरचा वापर करतात. फ्लाइट ट्रॅकर प्रामुख्याने ADS-B तंत्रज्ञानावर काम करतो, ज्यामध्ये विमाने त्यांचा GPS डेटा प्रसारित करतात. यासाठी, प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर अनेक थर्ड पार्टी अॅप्स देखील उपलब्ध आहेत, ज्याद्वारे विमानाची स्थिती ट्रॅक करता येते.