वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना थेट आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील मैदानावरुन केलेल्या भाषणात मशिदींवर भोंगे लावण्याबद्दलचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला आक्षेप घेत सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांना दंगली भडकावायच्या आहेत का. दंगली भडकवायच्या असतील तर राज ठाकरे यांनी त्यांचा मुलगा अमित ठाकरे याला प्रथम रस्त्यावर उतरवावे. त्यालाही मशिदीवरील भोंगे काढण्यास सांगवे. त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावाव्यात. राज ठाकरे यांची आज (12 एप्रिल) ठाणे येथे सभा होत आहे. या सभेत राज ठाकरे सुजात आंबेडकर यांना प्रत्युत्तर देणार का याबाबत उत्सुकता आहे.
सुजात आंबेडकर हे औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी अत्यंत स्फोटक वक्तव्य केले आहे. जेव्हा जेव्हा दंगली पेटतात तेव्हा त्या पेटविण्याचे काम उच्चवर्णीय ब्राह्मण करत असतात. या वेळी सुजात आंबेडकर यांनी बाबरी आणि भीमा कोरेगाव दंगलीचे उदाहरण दिले. सुजात यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुजात आंबेडकर यांनी, भाजपवर जोरदार हल्लाबोलही चढवला. भूकमरी, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर काम करण्याचे अश्वासन देऊन सत्तेत आला. परंतू, जेव्हा सत्तेत आला तेव्हा मात्र कोणीही बोलायला तयार नाही. कोरोना काळात संपूर्ण यंत्रणाच कोलमडली होती. त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. मात्र, भाजप आणि राज ठाकरे दंगलीच्या अनुषंघाने बोलत आहेत. जर त्यांना दंगलीच घडवायच्या असतील तर त्यांनी सर्वप्रथम आपली मुलं रस्त्यांवर उतरवावीत. मगच बहुजनांच्या पोलांना रस्त्यावर उतरवावे. लोकांना केवळ धार्मिक मुद्द्यांवर अडकवून ठेवायचे आणि यांनी आपला राजकीय फायदा उचलायचे उद्योग सुरु असल्याची टीकाही सुजात यांनी केली.