Sugar (Photo Credits: PixaBay)

दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना सामान्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सणासुदीच्या काळात साखरेला मागणी वाढल्यामुळे साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उसाचे (Sugarcane) उत्पादन घटल्याने साखरेच्या दर्जानुसार क्विंटलला सरासरी दर 3200 रुपये ते 3500 रुपयांपर्यंत गेला आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार यंदा गाळप हंगाम उशिरा सुरु होणार आहे. त्यातच उसाचे उत्पादन घटल्याने किरकोळ बाजारात 38 रुपये ते 40 रुपये किलोने विकली जाणा-या साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या गाळप हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने साखरेचे दर कोसळू नये म्हणून केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या होत्या. त्यात साखर कारखान्यांना साखर विक्रीचा दर ठरवून देण्यात आला होता. त्यामुळे साखर कारखान्यांना 3100 रुपयांपेक्षा कमी दराने साखरविक्री करता आलेली नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून सणासुदीच्या काळात साखरेला मागणी वाढली आहे. त्यामुळे व्यापारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून साखर खरेदी करीत आहेत. त्यामुळे साखरेच्या दरात वाढ होत आहे. हेही वाचा- Diabetes असणाऱ्या रुग्णांनी Low Sugar फळे खा, तंदुरुस्त रहा

गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 11 लाख टनांची साखरविक्री केली आहे. आता साखर कारखान्यांकडे 7 लाख 94 हजार टन साखरेचा साठा शिल्लक आहे. अंबालिका या खासगी कारखान्याकडे सर्वाधिक 1 लाख 6 हजार टन साखरसाठा आहे.

तर अगस्ती कारखान्याकडे 34 हजार टन, अशोक कारखान्याकडे चाळीस हजार टन, 'ज्ञानेश्वर'कडे 80 हजार टन, मुळा कारखान्याकडे 87 हजार टन, प्रवरा कारखान्याकडे 61 हजार टन साखरसाठा विक्रीसाठी शिल्लक आहे.