Tomato (संग्रहित संपादित प्रतिमा)

Subsidised Tomatoes: सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार दिल्ली आणि आसपासच्या परिसरात तसेच मुंबईतील किरकोळ बाजारात टोमॅटोची (Tomatoes) स्वस्त दरात विक्री करणार आहे. टोमॅटोची शुक्रवारपासून 50 रुपये किलो दराने विक्री होणार आहे. सध्या ते 60 रुपये किलो दराने विकले जात आहे. आधी केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीत 60 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने टोमॅटोची विक्री सुरू केली होती. नंतर त्याची विक्री मुंबईतही सुरू झाली.

आता आज ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी पत्रकारांना सांगितले की, उद्यापासून म्हणजेच 2 ऑगस्टपासून दिल्ली आणि मुंबई या राष्ट्रीय प्रदेशात 60 ऐवजी 50 रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू केली जाणार आहे. जोशी यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांच्या हस्तक्षेपानंतर टोमॅटोचे भाव आणखी कमी झाले आहेत.

नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. (NCCF) मोबाईल व्हॅनद्वारे या टोमॅटोची विक्री करत आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, 31 जुलै रोजी टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किंमत 61.74 रुपये प्रति किलो होती. बुधवारी दिल्लीत सरासरी भाव 70 रुपये प्रति किलो होता. अनेक उत्पादक राज्यांमध्ये उष्णता आणि अनियमित पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यामुळे गेल्या महिन्यात टोमॅटोचा भाव 100 रुपये किलोच्या पुढे गेला होता. (हेही वाचा: BSNL 5G Service: Jio, Airtel, VI चे टेन्शन वाढणार! BSNL लवकरच सुरु करणार 5G सेवा)

निधी खरे यांनी सांगितले की, मंत्रालय मदर डेअरीच्या सहकार्याने दिल्ली आणि आसपासच्या भागात 'सफाला' स्टोअरमध्ये टोमॅटो विकण्याचा विचार करत आहे. फेडरेशन घाऊक बाजारातून टोमॅटो खरेदी करून वाजवी किरकोळ दरात विकत आहे. किरकोळ स्तरावर नफा मार्जिन वाजवी राहील याची खात्री करणे, मध्यस्थांना होणारा नफा रोखणे आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. दरम्यान, आवक वाढल्याने पंधरवड्यापूर्वी 80 ते 100 रुपये भाव असलेला टोमॅटो आता 45 ते 50 रुपये किलोवर पोहोचला आहे. मात्र, दुसरीकडे पावसामुळे बिघाड झाल्याने इतर भाज्यांचे भाव कमालीचे वाढले आहेत.